रातराणीची दरवळं...
# नात्यांचा रिचार्ज...
समईतली वात मंद तेवत होती.देवघरात तेजोवलयं तयार झालं असं वाटत होतं.गौरींच्या चेहरयावर एक वेगळं तेज दिसत होतं.मंद प्रकाशात अगरबत्तीच्या धुराने सुवासित वातावरण होतं.देवाचं वास्तव्य जाणवुन देणार समाधानी शांत संगीतमय वातावरण वाटतं होतं.
सुधाताई मात्र वाती वळत विचारात पडल्या होत्या. कसा चिवचिवाट असायचा ह्याच घरात आधी.तीन मुलं,एका पाठोपाठची,त्यामुळे नुसता दंगा असायचा.प्रत्येकाला वेगळं असं काही नसायचं त्याकाळात.आता प्रत्येकाला स्वतंत्र कपाट,कपडे,वस्तु असतात,तसं नसायचं.आणलेली वस्तु सगळ्यांनी मिळुन वापरायची असायची.त्यामुळे मग भांडण होतं व मोठ्यांचा ओरडा बसु नये म्हणुन आपापसात मिटवली पण जायची.मोठ्यांपर्यंत तक्रार फारच क्वचित येत असे.
गणपती गौरींचा सण आला की मुलांमधेच जास्त उत्साह असायचा.रमाची रांगोळी सुंदर असायची म्हणुन ते कामं तिचेच असायचे.पारस आणि रवी सजावटीमधे काम करतं.सासुबाईंमुळे देवघरातली तयारी होतं असे.वाती वळणं,दिवे घासुन ठेवणं,पुजेच्या सामानाची तयारी करुन ठेवणे त्याचंच काम असायची.त्यामुळे बाकी स्वयंपाकघरातली तयारी आपल्याकडे असे.मग पुरणाचा स्वयंपाक म्हंटल की वेळ जात असे,भरपुर प्रकार असतं.त्यामुळे लवकर कामाला लागायला लागे.
पुजा आटोपली की मग केळीच्या पानात नैवेद्य वाढणे,सवाष्णींना पान मांडणे,सगळं रमा सहजपणे करतं असे.रोज भुक लागली पटकन वाढ म्हणणारी मुलं त्या दिवशी मात्र सवाष्ण भोजन होई पर्यंत कसे चुप असतं.सगळं कसं छान आनंदात पार पडतं असे.एखादा पदार्थ कमी पडला तर प्रत्येक जण आठवणीने दुसरयासाठी ठेवत असे.त्यामागचा त्याग बघुन खाणारयाचे डोळे पाणावत व मग वाटुन वाटुन खाल्ला जात असे.
दहा दिवस सगळ घर कसं भरल्या भरल्या सारखं वाटतं असे.नुसत्या खाणे पिण्याची चंगळ नसुन बौध्दिक देवाण घेवाण पण असायची.आजी पुराणातल्या कथा सांगत असतं.आई आजीसोबत म्हणुन म्हणुन मुलांना सगळ्या आरत्या तोंडपाठ असत.सगळे श्लोक म्हणता येत असतं.
आज सकाळी मुलांनी व्हिडिओ काँल करुन आँनलाईन दर्शन घेतले.रमाला स्वत:च्या सासरी गौरी गणपतीची पुजा होती.त्यामुळे तिचे येणे शक्य नव्हते.पारस बेंगलोरहुन तर रवीला अमेरिकेतुन येणे शक्य नव्हते.त्याच्या बायका जाँब करुनही सगळं हौसेने करत होत्या.तिथेही थाटात गणपती बसविला होता त्यांनी.खुप छान वाटावं असं अगदी रितसर सगळं केलं होतं.पण ती मज्जा नाही म्हणत बालपण आठवत होती मुलं.आजकाल डाएट करणारी ही मुलं मोदक,पुरणपोळी पण बिचकत खात होती.इको फ्रेंडलीच्या नादात डेकोरेशनचा प्रकार बदलला होता.आता भव्यदिव्यपणा वाढला होता.पण तरीही तो देवघरातला गणपती गौरींचा सण जास्त जवळचा वाटायचा.
सगळे जण आपापल्या घरी पुजा करत पण कोणाला कोणासाठी वेळ नव्हता.कुठलाही उत्सव हा नात्यांचा असतो.कितीही रोषणाई करु देत,सगळा परिवार एकत्र जमल्याशिवाय घराला घरपण येत नाही.सगळं करुनही आपण एकटेच पडलो आहोत असं प्रत्येकालाच आज वाटतं होतं.त्यामुळे सध्याच्या नवीन पिढीमधे रिचार्ज चा जमाना आहे,तसं सणावारांना का होईना एकत्र भेटुन नात्यांना रिचार्ज केला पाहिजे म्हणजे नातं टिकुन राहीलं,आयुष्यातील एकटेपणा निघुन जाईल, असं मनातल्या मनात म्हणतं सुधाताईंनी दरवर्षी गौरी गणपतीमधे एकाकडे सगळ्यांनी मिळुन जमुयात असे सुचवायचे ठरवुन समाधानाने डोळे मिटले.
© प्राजक्ता रुद्रवार
No comments:
Post a Comment