Tuesday, 25 September 2018

कथा - अधिकार

#अधिकार

आज अधिकारांची भाषा सुरु होती घरात.माझा अधिकारच आहे हा हे ऐकुन पार खचुन गेल्यासारखं झालं.खरचं असा हट्टाने अधिकार मिळवता येतो? आणि मिळाला जरी तरी तो आनंददायक ठरतो?कधी कधी अधिकाराने आपण बाजी जिंकतो पण काहीतर गमावतो पण. आयुष्य हे गणितासारखे थोडीच असते.एकच उत्तर मिळायला.
नेहमीप्रमाणे काम आटोपुन जरा आडवं पडाव असं ठरवुन राधिका बेडरुम मधे आली होती.मंद आवाजात रेडिओवर सुरु असलेलं गाण ऐकुन जरासं प्रसन्न वाटलं तिला.तेजसच्या तोंडुन अधिकाराची भाषा ऐकुन तिला आज कुमारची आठवण आली.त्याचेच गुण आले होते तेजसमधे खुप सारे.तोच बाणा,तिच ढब...
कुमारची आणि तिची पहिली भेट झाली तो दिवस आजही तसाच आठवत होता राधिकाला.उंचापुरा देह,चेहरयावर तेज,बोलण्यात आत्मविश्वास,रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला लेफ्टनंट कुमार कोणालाही आवडेलं असाच होता.राधिका पहातचं राहिली त्याच्याकडे.एखादा मुलगा इतका कसा रुबाबदार असु शकतो असा विचार करत असतानाच शाळेची घंटा वाजते.राधिकाच्या भावाच्या मुलाच्या शाळेत आज स्वातंत्रदिनानिमित्त केदारला प्रमुखपाहुणा म्हणुन बोलावले होते.कार्यक्रम संपला आणि सगळे पालक आपल्या पाल्यांना घेऊन गेले.राधिकाही घरी निघाली तेवढ्यात छोटा साहिल मला सोल्जरची सही हवी म्हणुन गेला.राधिकाही त्याच्या मागोमाग स्टेज जवळ उभी होती.साहिल सही घेऊन आनंदाने खाली उडी मारत आला त्यावर कुमारने कौतुकाने मनापासुन हास्य दिले राधिका कडे.तीही हसली.
काही दिवसानंतर राधिकासाठी खुपच छान स्थळ आहे असं जेवताना सगळ्यांची चर्चा सुरु होती.मुलगा आर्मी मध्ये आहे व तुला चालेल का असे राधिकाला विचारले.नकळतच तिच्या डोळ्यासमोर ले.कुमार तरळुन गेले.स्वत:शीच हसत ती हो म्हणाली.मग बघण्याचा रितसर कार्यक्रम ठरला.
आणि ठरल्याप्रमाणे 5 वाजता ती मंडळी आली.मंडळी म्हणजे कोण तर मुलगा,त्याचे आई,वडिल असं सुटसुटित कुटुंब.राधिका चहा घेउन बाहेर येऊन बघते तर ले.कुमारच होते.तिच्या चेहरयावर हलकसं स्मित पाहुन कुमार पण हसतात.औपचारिक बोलणी झाल्यावर कुमार म्हणतात की मला राधिकाशी काही बोलायचे आहे.दोघेही बाहेर गार्डन मधे बसतात.
तुम्हाला बघुन ओळखीचा प्रसन्न चेहरा पाहुन खुप छान वाटलं असं म्हणत कुमारनी बोलायला सुरुवात केली.मला तुम्ही खुप आवडलात पहिल्याच नजरेत.तुमच्याविषयी बरीच तारीफ ऐकली आहेच.पण मला एक विचारायचे होते की तुम्हाला माझ्या नोकरीविषयी कितपत माहीती आहे ते मला माहीती नाही.त्यामुळे सर्वात आधी त्यावर विचार करावा तुम्ही अशी माझी इच्छा आहे,असे कुमार म्हणाला.एका सैनिकाच पहिलं कर्तव्य,ध्येय सर्व देशासाठी असतं.त्यात आयुष्य देशासाठी कामी आले तर या सारखा दुसरा आनंद नसतो.तुम्ही सर्व बाजुंनी विचार करुन तुमचं मत कळवावं असं मला वाटतं.तुम्ही नाही म्हणालात मला तरी कुठलही वाईट वाटुन घेणार नाही.हे सगळं ऐकतच राहीली राधिका.माणुस म्हणुनही किती चांगला आहे कुमार असं तिला वाटुन गेलं.
कुमार गेल्यावर तिच्या डोक्यात त्यानी विचारलेले प्रश्न तरळत होते.खरचं एका सैनिकासोबत लग्न करणे म्हणजे गंमत नाही असे वाटले तिला.देशासाठी सर्वस्व वाहिलेल्या सैनिकावर पहिला हक्क देशाचा.मग आपला राहिलं.आणि कणखर राहुन साथ दिली पाहिजे अश्या प्रसंगात.सर्व विचार करुन कुमारला होकार कळविला तिने.
होकार कळल्यावरही हुरळुन न जाता कुमारने राधिकाला काँल केला.खरचं तु मनाने तयार आहेस का असं विचारल्यावर राधिकाला खुप बरं वाटलं.तिच्या चेहरयावरचे हास्य पाहुन मात्र कुमारला हायस वाटलं.जगातलं सगळं सुख तुला देईन राधिका.तुला पहिल्या वेळेस पाहिलंस तेव्हाच तु मला आवडली होतीस पण माझ्यावर पहिला अधिकार देशाचा आहे.म्हणुन अश्या मुलाशी लग्न करुण्यासाठी खुप मुली तयार नसतात.पण तुझ्या होकाराने मला आभाळ ठेंगण झालं.काय बोलु अन काय नको असं झालं होत कुमारला.
बघता बघता पधंरा दिवसात लग्न करायच ठरलं अन त्यानंतर काही दिवस ती इथेच रहाणार होती.क्वार्टर्स मिळाले की कुमार तिला घेऊन जाणार होता.
लग्नानंतरचे दिवस कसे लवकर गेले कळलचं नाही.आज जाँबसाठी जायचा दिवस आल्यावर मात्र कुमारला सारखे भरुन येत होते.पण राधिकाने त्याला सांभाळुन घेतले.लवकरच मी पण येतेच आहे हे सांगुन हसुन वेळ निभावुन नेली होती तिने.पण दोघांनाही जडचं जाणार होतं हे माहीती होतंच तसं.
कुमारने जाँईन झाल्यानंतर प्रथम क्वार्टर्स साठी निवेदन दिले.काश्मिरजवळच त्याची पोस्टींग होती.त्यामुळे फारश्या लोकांनी घर केलेले नव्हते.फार कमी फँमिलीज रहात होत्या.कुमारचे सिनिअर आँफिसर ह्यांची फँमिली एक महिना आधीच शिफ्ट झाली होती.त्यामुळे राधिकाला शेजार व सोबत मिळणार होता.महिन्यात घर मिळाले,राधिका आली आणि घराला घरपण आले.आता सोडुन रहायचं नाही ठरवुन टाकलं लगेच दोघांनी.
सैनिकांचे जीवन कसे असते हे राहिल्यावरच कळु लागलं होत तिला.सगळीकडे पहारा असे.सतत सतर्कपणे काम सुरु असायचे.दुरवरुन आलेली नवनवीन मुलं कधी कधी खुप भावुक होऊन जात असत.मग एखादया सिनिअर कडे जेवणाचा कार्यक्रम ठेवला जाई.त्या वातावरणात मुलांना जरा आश्वासकपणे समजावले जात असे.आपला देश व आपण देशासाठी आहोत ही भावना कोरली जाई.राधिकाला वाटे की फक्त पिक्चरमधे पाहुन कधीच सत्याची जाणिव होऊ शकत नाही इथल्या परिस्थितीची.त्यासाठी सैनिकाचे आयुष्य जगले पाहिजे.
जेमतेम चार महिने गेले नसतील, सध्या वातावरण तंग आहे अशी चर्चा सुरु झाली होती.परिस्थिती पाहुन बेस कँम्प हलवायचे ठरविण्याचे सुरु होते.
त्यातच राधिकाला आपल्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार ह्याची चाहुल लागली.कुमारच्या आनंदाला पारावार नाही उरला.राधिकाला घेऊन अक्षरश: नाचलाच तो.सगळ्यांना काँल करुन सांगितलं त्याने.तु आता काहीही करु नकोस ,आराम कर,मी सगळ करेन असं तिला ठाम बजावलं त्याने.राधिकाला कुठलाही त्रास होतं नसल्यामुळे ती तसं करु देत नव्हती ही गोष्ट वेगळी.
पण महिन्यात बाहेर वातावरण अजुन खराब होत चाललं होत.त्यामुळे सगळ्याच्या फँमिलीना हलविण्याचे ठरले.
बेस कँम्प हलवुन सगळ्यांच्या फँमिलीजना हलवावे लागेल हे सुरक्षात्मक पाऊल उचलणे गरजेचेच होते तरीही कुमारला कुठेतरी मनातुन वाईट वाटतं होते.अश्या अवस्थेत राधिकाला आपण जवळ हवे आहोत हे त्याला कळत होतं पण नाईलाज होता.राधिकाचं नुसतं नाव काढलं तरी त्याच मन हळवं होत होतं.आणि आतातर आपल्या येणारया बाळाच्यासाठी जास्त काळजी वाटतं होती.पण ह्या स्ट्रिंग आँपरेशन मधे तो निष्णातपणे नैतृत्व करु शकणार होता.त्यामुळे त्याने स्वत:हुन ही जबाबदारी स्विकारली होती.आणि तो ती फत्ते करणारच याचा सगळ्यांना विश्वास होता.
राधिकाला काही दिवस पुण्याला जावे लागणार हे सांगताना कुमारने आंवढा गिळला.ठिक आहे ना,काही दिवस माझाही आराम होईल असे म्हणत तिने तो क्षण निभावुन नेला.मनातुन खुप भिती वाटतं होती तिला.युध्दात काहीही होऊ शकते हे काही सांगण्यासारखे नव्हते.पण असे बोलुन तिला कुमारची हिम्मत कमी करायची नव्हती.ह्या क्षणी ती एका सैनिकाची पत्नी होती ह्याची तिला जाणिव होती.त्यामुळे हसत चेहरा ठेवुन तिने सामानाची बांधाबांध केली.
राधिका निघाली तेव्हा एखादया बघड्याप्रमाणे कुमारने तिला जवळ घेतले.त्या क्षणी बोलणे दोघांनाही जड गेले.अश्रुंना वाट मिळाली.अबोल्यातचं सर्व काही कळलं दोघांना.कधी कधी शब्द पोरके होतात अन तरीही भावना पोहोचतात.मुकेपणाने मन बरचं काही पोहोचवुन देतो.
राधिका पुण्याला पोहोचेपर्यंत काळजीच वाटत होती त्याला पण राधिका ब्रेव्ह गर्ल आहे म्हणत तो स्वत:चे समाधान करत गेला.आज पुर्ण दिवस सगळ्यांच्याच घरी असेच वातावरण होते कँम्पात.पुढची पावलं गनिमी काव्याने टाकणे आवश्यक होते.आज थापा साहेब सगळ्यांना पुढचा अँक्शन प्लान कसा राहिलं ह्यावर चर्चा करणार होते.
राधिका सुखरुप पोहोचली.काही त्रास झाला नाही हे ऐकुन त्याचा जीव भांड्यात पडला.आता इकडयी कसलीच चिंता नव्हती व एकच ध्यास मिशन कामयाबीचा होता.येत्या 3-4 दिवसात बाँर्डरवर जायचे होते.14 लोकांची टिम घेऊन त्याला ही कामगिरी फत्ते करायची होती.त्यासाठी दोन दिवसं पुर्णपणे
कधी न कोणते पाऊल उचलायचे हे सांगण्यात आले.ले.कुमार व टिम ही कामगिरी फत्ते करतीलच अशी सगळ्यांना शाश्वती होती.
राधिकालाही हा आत्मविश्वास बळ देत होता.नाहीतर प्रत्येक क्षण जगणे तिच्यासाठी अवघड जात होते.त्यातच उद्या निघणार व आत्ता मोहिम फत्ते झाल्यावरच काँल करतो म्हणुन कुमारचा काँल आला.हे मिशन नक्कीच यशस्वी होणार हो,ह्यात वादंच नाही.मी तुमच्या काँलची वाट पहाते,असे सांगुन राधिकाने त्याला बळ दिले.
आणि 14 लोकांची टिम घेऊन ले.कुमार बाँर्डरवर निघाला....
कुमारशी डायरेक्ट काँन्टँक्ट होणे शक्यच नव्हते.फक्त त्याची ख्याली खुशाली कळत असे.राधिकाच्यामते तेही काही कमी नव्हते.आपण किती लकी आहोत किमान एवढेतरी कळते ह्यातच तिने आनंद मानला.आधीच्या काळात तर काहीच पत्ता लागत नसे,असा विचार करुन तिने स्वत:चे समाधान केले.चांगल्या वीरांच्या कथा वाचण्याची तिला आवड होती.त्यामध्ये मन रमवणे हा एक सोपा उपाय शोधला होता तिने.त्यामुळे होणारया बाळावर चांगले गर्भ संस्कार होतील असे तिला वाटत होते.
कुमार पोहोचुन त्याने बाँर्डरवर स्ट्रिंग आँपरेशनची तयारी केली.शत्रुच्या हमल्याला जरा शांततेत उत्तर दयायचे ठरले होते.त्यामुळे हल्ल्यासाठी पहाटेची वेळ ठरली होती.सर्वत्र शांतता असताना अचानक हल्ला करायचा आणि बेसावध शत्रुला कब्जात धरायचं होत.पहाट होण्यापुर्वीच सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन कामगिती फत्ते करण्याची शपथ घेतली व एकसाथ पावलं उचलली.
आज पहाटेपासुनच राधिकाला बेचैन होत होतं.एक दोन दिवसात स्ट्रिंग आँपरेशन होणार असे कळले होते.पोटातल्या पिल्लालाही कळले वाटते की आज असे काहीतरी होणार आहे.आज सकाळपासुनच खुप धडपड सुरु होती त्याची.त्याची म्हणाली आणि तिला स्वत:चे खुप हसु आले.कुमारने सांगितलं होतं की मला तर मुलगी हवी आहे हा.एकदम गोड,तुझ्यासारखी.त्यावर आपण म्हंटल होत की नाही हा,मला तर मुलगाच हवा.किती वेळ वाद घातला होता आपण.आज सगळं काही तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं.जाताना कुमारने पोटावर हात फिरवुन सांगितलं होत की चँम्प लवकरच येतोय तुझ्या भेटीला,तोपर्यंत मम्माला जप हा.आज खरचं पहाटेपासुनच मोठ्या माणसासारखं मी सोबत आहे हे जाणवुन देत आहे की काय असं तिला वाटलं.नकळतंच तिने पोटावरुन हात फिरवला.
सकाळपासुनच टिव्हीवर युध्दाच्या बातम्या येत होत्या.अचानक झालेल्या हमल्याला उत्तर देणे कठिण जात होते शत्रुला.काश्मिर हा आधीच खुप संवेदनशील भाग आहे आणि तिथे कायमंच तणाव असतो.त्यामुळे तिथे लगेचच शत्रुकडुन प्रतिउत्तर अपेक्षितच होते.पण गनिमी काव्याने आपल्या सैनिकांनी विजय मिळवला होता.सर्वत्र खुप आनंद साजरा केला जात होता.फक्त ह्यामध्ये आपले तीन जवान जबर जखमी झाले होते.त्यांना जवळच्याच हाँस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं.त्यात ले.कुमारचं नावं ऐकुन राधिकाचे हातपायच गळाले.कुमारच्या बाबांनी आणि तिच्या भावाने लगेचचं त्याच्या तब्येतीची चौकशीसाठी काँल केला.तर कळलं की कुमारच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाल्यामुळे दिल्लीला हलवावं लागेल.कुमारची परिस्थिती खुपच नाजुक होती.ताबडतोब इलाज होणे गरजेचे आहे.सरकारी विमानाने तातडीने दिल्लीला आणण्यात येणार होतं.राधिकाची डिलिव्हरी डेट जवळं आल्यामुळे तिला जाणे शक्य नव्हते.म्हणुन ते दोघेचं दिल्लीकडे रवाना झाले...
कुमारला खास विमानाने दिल्लीला आणण्यात आलं.ले.कुमार साठी जलदगतीने पावलं उचलली जात होती.एम्स हाँस्पिटलच्या बाहेर बरीच गर्दी जमा झाली होती.सगळे निष्णात डाँक्टर्स बोलविण्यात आले होते.कुमारला मेंदुला जबरदस्त मार बसला होता.त्यामुळे डाँक्टर्स पण शर्तीचे प्रयत्न करत होते.
हे क्षण राधिकासाठी खुपच अवघड जात होते.काळजीने तिला काहीही सुचत नव्हते.बाळाच्या बाबाची वाट पहात होतं बाळ.खरतरं आपण तिथे हवे होतो असे तिला खुप वाटत होते.पण नववा महिना लागल्यामुळे कधीही काहीही होऊ शकले असते.कुमारच्या चौकशीसाठी भावाला सतत फोन करण्याशिवाय पर्याय नव्हता तिच्याकडे.गेले तीन तास आँपरेशन सुरु होते.काहीच कळत नव्हते तिकडची काय परिस्थिती आहे ते.देवा माझ्या कुमारला लवकर बरा कर म्हणत देवाला साकड घालण्याशिवाय पर्याय नव्हता तिच्याकडे.
डाँक्टर अजुन बाहेर आले नव्हते.नर्स लोकांची धावपळ सुरु होती.कुमारच्या बाबांनी बरेचदा विचारायचा प्रयत्न केला तरीही काही कळतं नव्हते.कुमारच्या मित्रांनी चहा नाश्ता दिला दोघांनाही पण काहीही घ्यायला तयार नव्हते ते.तेवढ्यात आँपरेशन थिएटर मधुन डाँक्टर येताना पाहुन सगळे धावत गेले.
इकडे राधिकाच्या पोटात दुखायला लागल्यामुळे तिला दवाखान्यात नेलं होतं.टेंशनमुळे रक्तदाब वाढला होता.डाँक्टर मँडम म्हणाल्या की हे सहाजिकच आहे तिच्या बाबतीत.एवढं मोठ टेंशन असतानाही ती ह्या परिस्थितीत बरंच सांभाळुन घेत होती.राधिकाची आई घाबरु नका,लवकरच डिलिव्हरी होईल.तुमची काळजी करु नका,असे म्हणाल्या डाँक्टर मँडम.
एम्स हाँस्पिटल मधे मात्र डाँक्टर बाहेर आले ते चेहरयावर खुप टेंशन घेउनच.कुमारचे आँपरेशन केले आहे आम्ही पण येते 48 तास त्याची खुप काळजी घ्यायला हवी.त्याची तब्येत क्रिटिकल आहे व मेंदुला इजा झाल्यामुळे काहीही होऊ शकत.देवाला प्रार्थना करण्याशिवाय आता पर्याय नाही, जे जे शक्य होतं ते आपण केलं आहे.आयसीयु मधे असल्यामुळे तुम्हाला भेटता येणार नाही पण तुम्ही बाहेरुन पाहु शकता असे म्हणुन कुमारच्या बाबांच्या खांदयावर थोपटवुन डाँक्टर निघुन गेले.कुमारच्या डोक्यावर संपुर्ण बँडेज होते.चेहरा दिसतच नव्हता.आँक्सिजन मास्क लावला होता.पण कुमार वाचला होता हे काही कमी नव्हते,असे म्हणत कुमारच्या बाबांनी डोळे पुसले.आता पुढचे 48 तास सुखरुप पार जावेत हे फक्त व्हायला हवे होते.त्यासाठी ते देवाची प्रार्थना करु लागले.
राधिकाला मुलगा झाला,पेढे हवेत राधिकाची आई असे म्हणत डाँक्टर मँडमनी राधिकाच्या आईच्या हातात बाळाला दिले.राधिका पण ठिक आहे म्हणाल्या त्या.हे ऐकुन राधिकाच्या आईच्या डोळ्यातुन आनंदाश्रु टपकु लागले.राधिकाच्या डोक्यावरुन हात फिरवत त्यानी राधिकाला जवळ घेतले.आई कुमार कसे आहेत हा प्रश्न ऐकुन त्या भानावर आल्या.कुमारचे आँपरेशन ठिक झाले व आता तो ठिक आहे हे ऐकुन राधिकाने खर बोलते आहेस ना आई म्हंटले.त्यावर त्यांचा होकार ऐकुन राधिकाला रडु फुटले.देवाचे आभार मानावे तितके कमीच आहे असं तिला वाटलं.
आता लवकरच आपण कुमारला भेटायला जाऊ आणि त्यांना घेऊनचं येऊ असा विचार आला तिच्या मनात.
पण बहुतेक देवाला हे मान्य नसावे...
देवाला हे मान्य नव्हते की कुमारच्या जीवाचे काही बरे वाईट व्हावे पण त्याची स्थिती पहाता सगळेच हतबल झाले.कारण कुमार कोमामध्ये गेला होता.डाँक्टरांना जी शक्यता वाटत होती तेच झालं.मेंदुवरील इजा इतकी जबरदस्त होती की कुमार वाचलाच हे खुप होते.
कुमारची स्थिती जैसे थीच होती, तो कोमातच होता.डाँक्टरांच्या मते हळुहळु परिस्थिती बदलेलं पण नक्की कधी होईल हे सांगता येत नसते.राधिका भेटायला यायच्या एेवजी कुमारलाच पुण्याला शिफ्ट करायचं ठरलं.पुण्यात आल्यापासुन कुमारची हाँस्पिटलमधे काळजी घेण्यासाठी नर्स व डाँक्टर्सची टिम होतीच पण राधिका स्वत: सगळं करत असे.छोट्या तेजसचं सगळं करुन कुमारच करता करता तिची खुप तारांबळ उडायची.पण ती सगळं जिद्दीने करायची.
आणि आज गेली सोळा वर्षे राधिकाचा हा दिनक्रम सुरु होता.तेजसचा दहावीचा निकाल लागला आणि आज त्याला सैनिकी शाळा जाँईन करायची होती.तेजसने सैन्यात न जाता दुसरं क्षेत्र निवडावं असं तिला वाटतं होतं.पण मी पण आर्मीत जाणार, हा माझा अधिकार आहे आई असं म्हंटल्यावर अधिकाराने होतात का सगळ्या गोष्टी ह्या विचारात पडली होती ती.आज बाबांचे स्वप्न होते देशासाठी लढायचे,त्यांनी ते करुन दाखवले.मी पण तेच करणार,देशाचा जास्त हक्क आहे माझ्यावर,असं म्हणुन त्याने आईला जवळ घेतले.आई,मी लहानपणापासुन सैनिक बनणार म्हणायचो,बाबांनाच डोळ्यासमोर ठेऊन वाढलो,तुझी भक्ती पाहुन खुप काही शिकलो,देशाला आज तरुण रक्ताची गरज आहे,तुझ्यासारख्या खंबीर मनाच्या स्त्रीने अाता मागे वळुन बघता कामा नये,माझ्यावर विश्वास ठेव व मला हो म्हण,तेजस बोलत होता,राधिकाच्या डोळ्यातुन अश्रु वाहत होते.
खरे आहे बाळा,मला कुठलाही अधिकार नाहीये की मी तुला देशासाठी काम करु नको म्हणायचा.एका आईच स्वार्थी मन तयार होतं नव्हतं रे,बाकी काही नाही.बाळा तु नक्कीच नावं करशील ह्यावर माझा विश्वास आहे.जा तु सैन्यामध्ये,माझा तुला पाठिंबाच असेल,असं म्हणुन तेजसच्या कपाळावर तिने आेठ टेकवले.
बघितले तर घड्याळात चार वाजत होते.हाँस्पिटल मध्ये जायची वेळ झाली होती.कुठेतरी कुमार एक दिवस नक्कीच बरा होईल, ही आशा ठेवुन राधिका हाँस्पिटलच्या दिशेने निघाली....

© प्राजक्ता रुद्रवार

राधिका सारख्या बरयाच महिला आज आपल्या सोबत आहेत,कोणी पत्नी म्हणुन कोणी आई म्हणुन स्वत:चे अधिकार बाजुला ठेवुन आपल्या सुरक्षेसाठी लढणारया जवानांना जन्म दिला,साथ दिली.त्यांना मी मनापसुन सलाम करते....

No comments:

Post a Comment