Tuesday, 25 September 2018

कथा-मृगजळ...

रोजच्याच सारखे पहाटे उठुन दिवसाची सुरूवात करायचा जरा कंटाळाच आला होता प्राचीला.रविवारच असल्यामुळे जरासे लोळत पडावे असे वाटत होते.पण अंधारात पडुन पण रहावेसे वाटेना म्हणुन आळस दुर करुन उठण्याचे ठरवुन प्राची बेडरुमच्या बाहेर आली.पहाटेच्या अंधारात चाचपडत टेरेसवर आल्यावर तांबड फुटताना आकाश कसे सुंदर दिसते हे प्रथमच जाणवले तिला.सर्वत्र केशरी छटा दिसत होती,त्यातच पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकु येत होता.आँफिसच्या धावपळीत कधी पहाटे निवांत वेळच मिळत नसे तिला.कुठेतरी मनात हे जाणवले पण दुर्लक्ष करत ती उगवणारया सुर्याची लाली पहात राहीली.
कधी काळी ह्याच सुर्याच्या साक्षीने केदारने आपल्याला प्रपोज केले होते.त्यावेळेस ह्या सुर्याच्या लाली पेक्षा लालीमा तुझ्या चेहरयावर आहे म्हणाला होता केदार.आणि लाजेने चुर होत आपण चल काहीतरीच हं असे म्हंटले होते.आजही तो प्रसंग सिनेमा सारखा डोळ्यांसमोर येत होता तिच्या.
गेली पंधरा वर्षे आपण धावतच आहोत असे वाटुन गेले तिला.पंधरा वर्षांपुर्वी एका पार्टी मधे तिची आणि केदारची भेट झाली होती.फक्त ओळख,नाव काय वगैरे.आधीच ती पार्टी म्हणजे तिच्या आईच्या मैत्रिणीने म्हणजे केदारच्या आईने केदारच्या सक्सेसचे सेलिब्रेशन म्हणुन ठेवली होती.केदारने आयआयटी मधुन इंजिनियरींग प्रथम श्रेणीत पुर्ण करुन चांगला उच्चपदाचा जाँब मिळविला होता.आईच्या इच्छेखातर प्राचीला ह्या पार्टीत यावे लागले होते.तसा माझा काय संबंध असे आईला म्हणुनही पाहीले होते तिने,पण मग आईचा ओरडा खावा लागला होता.प्राचीच्या आईच्यामते असे स्थळ शोधुनही सापडणार नव्हते.पण असे काही म्हणल्यास प्राची भडकेल म्हणुन त्या काही म्हणाल्या नव्हत्या.त्यामुळे जरासे तोंड पाडुनच प्राची आली होती पार्टीला.तिथेही जुजबीच बोलणे झाले केदारशी.त्यामुळे लव्ह अँट फर्ट साईट वगैरे काहीही न घडता प्राची घरी आली.
पण तिकडे केदारला कुठेतरी प्राची आवडुन गेली.त्याच्या डोळ्यासमोरुन तिचा चेहरा जातच नव्हता.सकाळी उठल्याबरोबर त्याने आईकडे चौकशी केली.प्राची ही एका बँकेत नोकरी करते हे समजताच नकळतच लवकर तयार होऊन तो बँकेत गेला.प्राची रोजच्या सारखी बँकेत आली तर बाहेरच तिला केदार वाट पहाताना दिसतो.केदार तिच्याकडे बघुन ओळखीची स्माईल देतो.अरे,तुम्ही इकडे कसे विचारत प्राची समोर येते.मित्राचे काम होते म्हणुन आलो होतो असे उत्तरत केदार बरेच बोलतो.पण प्राचीला उशीर होत असल्यामुळे चला निघते म्हणुन ती निरोप घेते.इच्छा नसुनही केदारला निरोप घ्यावा लागतो.पण ह्या घाईतही केदार तिचा मोबाईल नंबर घेतो व स्वत:चा नंबर देतो.
हळुहळु केदार व प्राची मध्ये मैत्री होते.प्राचीला जाणवते की केदार खुपच हुशार आहे.नोकरीतही त्याची पोस्ट खुप चांगली असते.प्राचीही खुप मोठ्या नाही पण चांगल्या पगारावर नोकरीला असते.
त्यातच एक दिवशी केदार प्राचीला प्रपोज करतो.प्राचीलाही तो आवडत असल्यामुळे तीही होकार देते.दोघांचेही घरचे आधीपासुनच ओळखीचे असल्यामुळे घरातुनही कुठला विरोध न होता दोघांचे लग्न थाटामाटात पार पडते.
सुरुवातीच्या काळ खुपच लवकर लवकर गेला.लग्नानंतरही नोकरी व घर सांभाळत प्राची खुप खुष होती.पण 2 वर्षे झाल्यावर घरात नवीन छोटा पाहुणा येणार कळल्यावर नोकरी सोड म्हणुन केदारने खुपच हट्ट केला प्राचीकडे.आर्थिक परिस्थिती पहाता त्यांना कशाचीही कमी नव्हती.सधन घरातील केदारलाही खुपच चांगले पँकेज पण होते.पण स्वावलंबी प्राचीला कुठेतरी बँकेतील नोकरी तेही ती पर्मनंट झाली असल्यामुळे पटेना.काही दिवस असेच चर्चेत गेले.प्राचीचा हट्ट पहाता केदार ने बरेच समजवण्याचा प्रयत्न केला.बाळंतपणाची 6 महिने रजा मिळेलच असे म्हणत प्राचीने रुटीन सुरू ठेवले होते.ह्यातच त्यांचे हळुहळु खटके उडायला लागले होते.
बघता बघता तो क्षण आला व छोट्याश्या अनिशाने त्यांच्या संसारात पाऊल ठेवले.केदारला आकाश ठेंगणे झाले.आता तर त्याचा सगळा वेळ अनिशामय झाला होता.मिळेल तेवढा वेळ तो अनिशा सोबत घालवत असे.त्यातच आनंदाची बातमी म्हणजे केदारचे प्रमोशन होऊन त्याला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली होती.पण प्रश्न येत होता तो प्राचीच्या नोकरीचा.प्राचीने नोकरी सोडुन आपल्यासोबत यावे असे केदारचे मत होते.प्राचीच्या मनाची द्विधा मनस्थिती होती.पण शेवटी जाण्याचा निर्णय घेऊन तिने सर्वांचा ओढवणारा रोष टाळला होता.
बघता बघता अमेरिकेत येऊन वर्ष होत आले होते.अनिशाला एकटीला सांभाळताना तारेवरची कसरत होत असे. एक तर नोकरी सोडुन दिवसभर घरी बसणे त्रासदायक वाटत होते.अनिशासाठी दिवसातुन चार चारदा काँल करणारा केदारचे वाढत्या व्यापामुळे फोन करणे कमी झाले होते.आल्यावरच काय तो दोघांमधे संवाद घडत असे.त्यातही बिझीनेस काँल्स असे काहीतरी सुरु असे.सर्वच अर्थानी प्राची एकटी पडली होती.केदारचे प्रमोशन्स होत होते.भारतात प्रत्येकाला वाटत असे की नशीब काढले पोरीने.अमेरिकेसारख्या देशात मस्त एंजाँय करतेय पोरगी.
बघता बघता अनिशा दहावीत गेली व तुम्ही भारतात परत जा,इथले वातावरण ठिक नाहीये अनिशासाठी म्हणुन केदारने प्राचीला खुपच भंडावुन सोडले होते.पण इतके दिवस इथल्या वातावरणात वाढलेल्य़ा अनिशाला हे मान्य नव्हते.पण केदारने त्यांना बळजबरीने भारतात पाठवुन दिले.तो स्वत: काही दिवसात नोकरीची नवीन संधी बघुन भारतात परत येणार होता.
अनिशाची अकरावी सुरु झाली होती.नवीन वातावरणात सामावुन घेणे तिला कठिण जात होते.
हे सगळं सांभाळताना स्व:तला विसरुन गेली होती ती.आज केदार एक आठवड्यासाठी भारतात येणार होता.आज काय तो निर्णय घ्यायची वेळं आली होती.अनिशाला घेऊन परत त्याच वातावरणात जायचं की केदारने सर्व सोडुन इथे यायचं.पण नियतीला हे मान्य नसावं बहुधा.केदार ते फँन्टसीचे जगं सोडायला तयार नव्हता.स्वत:चे असे कुठलेच जग नसल्यामुळे खुपच अगतिक वाटायला लागलं होतं तिला.पण मग आता भारतातच राहुन स्वत: काही तरी करायचे ठरवुन तिने एक छोट्या प्रमाणात घरघुती खाद्य पदार्थांचे युनिट सुरु केले.हळुहळु जम बसतं गेला.मागणीच्या मानाने पुरवठा करताना मनुष्यबळ कमी पडु लागले.
आजवर स्वत:ला विसरुन संसार एके संसार करणारया प्राचीला कुठेतरी मानसिक समाधान मिळत होतं.पण ह्या सगळ्यात आपण काय कमावलं हा विचार सतत येत असे.आज स्वत:चं सगळं सोडुन ज्याच्यासाठी ती आली होती तो स्वत:च्या व्यापातुन तिला वेळ देऊ शकत नव्हता आणि अनिशाला आता तशी तिची गरज ऊरली नव्हती.एखाद्या मृगजळाच्या मागे धावताना कसे वाटत असेल हे आज तिला जाणवतं होतं.आपल्या सारख्या अनेक जणी अश्याच धावतं असतील ना,काय शोधात असतील बरं त्या मनाच्या समाधानासाठी?असा एक विचार मनात येऊन गेला तिच्या.
पण हा विचार दुर करुन काही गरजु महिलांना आपण रोजगार दिला यातचं स्वत:चं समाधान मानुन ती रोजच्या प्रमाणे कामाला लागली...

© प्राजक्ता रुद्रवार

No comments:

Post a Comment